✍️मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :-जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेत धावत्या एसटी बसचा मागील भाग अचानक तुटून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही क्षणांचा फरक असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अशी दुरावस्था असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात एसटी हीच सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरदार, रुग्ण आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिक दररोज एसटीवर अवलंबून असतात. मात्र जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बसांमुळे प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन, सुरक्षित आणि अत्याधुनिक एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यासाठी विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदने दिली, आंदोलने केली, मोर्चे काढले; परंतु अद्यापही जिल्ह्याच्या वाट्याला पुरेशा प्रमाणात नवीन बसेस आलेल्या नाहीत.
दरम्यान, जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पावरूनही चर्चा रंगू लागली आहे. काही नागरिकांचा आरोप आहे की, सरकार उद्योगविकास आणि विमानतळासारख्या मोठ्या प्रकल्पांवर भर देत असतांना, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजेच्या सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे
. “आधी सुरक्षित एसटी बसेस द्या, त्यानंतर विकासाच्या मोठ्या योजना राबवा,” अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
धावत्या बसचा मागील भाग तुटून पडल्याची घटना ही केवळ अपघात नसून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जीर्ण बसांची तातडीने तपासणी करून त्या बदल्यात नवीन, अत्याधुनिक आणि सुरक्षित एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाभरातून जोर धरत आहे.










