रेणुकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री दीपक केसरकर देवीचरणी नतमस्तक
सुरेश राठोड
तालुका प्रतिनिधी
माहूर
माहुर:-श्रीक्षेत्र माहूर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ असलेल्या श्री रेणुकामातेच्या माहूरगडावर शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तिमय उत्साह दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) सप्तमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडले. या वेळी श्री महालक्ष्मी मंदिरासमोर २१ कुमारिकांचे विधिवत पूजन करण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे तसेच माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही माहूरगडावर श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले.
नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी श्री रेणुकामातेच्या मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली. देवीचा आकर्षक शृंगार करून सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले. त्यानंतर पुजारी भवानिदास भोपे, युगम भोपे, अमित भोपे व उज्ज्वल भोपे यांच्या हस्ते घटाला सातवी माळ अर्पण करण्यात आली. देवीची महाआरती झाल्यानंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण माहूरगड परिसर दुमदुमून गेला.
सप्तमीच्या पवित्र पर्वावर श्री महालक्ष्मी मंदिरासमोर २१ कुमारिकांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. चंद्रकांत भोपे, अरविंद देव, अमित भोपे आणि उज्ज्वल भोपे यांच्या हस्ते कुमारिकांचे विधिवत पूजन करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. नवरात्रोत्सवातील कुमारिका पूजनाला धार्मिक महत्त्व असल्याने या सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माहूरगडावर येऊन श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. त्यांनी देवीची विधिवत पूजा करून महाआरती केली. यावेळी आमदार स्वप्ना म्हात्रे उपस्थित होत्या. तसेच राज्याचे माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही श्री रेणुकामातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूरगडावरील धार्मिक कार्यक्रमांना वेग आला असून, रविवारी अष्टमीनिमित्त रामगड किल्ल्यातील श्री महाकाली देवीच्या मंदिरात पारंपरिक होम-हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने मान्यवरांना देण्यात आले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवामुळे संपूर्ण माहूरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. मंदिर परिसरात देवीच्या जयघोषासह धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने माहूरगडावर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.














