वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) जवळ असलेल्या मेसा या गावामध्ये जिन्यावरून उतरतांना अचानक तोल जाऊन पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मेसा येथील शामराव मारोती मेश्राम (वय ६०) हे बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतातील कापूस घरामध्ये जागा नसल्यामुळे दुसऱ्याच्या घरावर ठेवत होते. पाऊस लागल्यामुळे तो कापूस झाकण्याकरिता ते गेले होते. त्यावेळी जिन्यावरून खाली उतरतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन सुना, पत्नी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.













