✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-आरोग्यसेवेतील गुणवत्ता आणि सुरक्षितता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे बर्थ अटेंडेड अँड सेफ डिलिव्हरी (प्रसूती व सुरक्षित प्रसूती प्रक्रिया) या विषयावर आयोजित दोन दिवसीय सिम्युलेशन – आधारित कार्यशाळेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. ९ व १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या कौशल्याधारित प्रशिक्षणात बी.एस्सी. नर्सिंगच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हरियाणातील गुरुग्राम येथील विद्यंता सिम्युलेशन बेस्ड ट्रेनिंग (Vidyanta Simulation Based Training) या नामांकित संस्थेच्या तज्ज्ञ टीमने कार्यशाळेला मार्गदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक वंदना भुजेल, अँड्रिया लाल आणि मयंक यांनी अत्याधुनिक सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसूती कक्षातील वास्तविक परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर उभी केली. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनमोल संधी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे यांच्या प्रास्ताविकाने झाली, त्यांनी हे प्रशिक्षण भावी परिचारिकांसाठी अत्यावश्यक व्यावसायिक टप्पा असल्याचे अधोरेखित केले. माता व नवजात अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी सुरक्षित प्रसूती प्रक्रियेचे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपत्कालीन प्रसूती काळजी (Emergency Obstetric Care) तसेच नवजात बालकांचे पुनरुज्जीवन (Neonatal Resuscitation) यावर सखोल प्रात्यक्षिक सराव केला. सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणामुळे कोणत्याही प्रकारच्या जोखमीशिवाय निर्णयक्षमता, संघभावना आणि तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करण्यात विद्यार्थ्यांना यश मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला असून ते आगामी हॉस्पिटल इंटर्नशिप आणि व्यावसायिक कारकिर्दीसाठी अधिक सक्षमपणे सज्ज झाले आहेत. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालय प्रशासन व तज्ज्ञ प्रशिक्षकांचे कौतुक केले.









