‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा नंतर आमदार देवराव भोंगळे यांचा विकासकामांचा झंझावात.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गोंडपिपरी:-दि. १३
ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा येथील विकासासाठी राज्य शासनाने ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता मोठी गती मिळणार आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित मानले जात आहे.
संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान हे महाराष्ट्र आणि शेजारील तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांचे अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते, तर उत्सवाच्या काळात गर्दीचा महापूर लोटतो. भाविकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. हीच गरज ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी विशेष प्रयत्न करून अलिकडेच या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला होता. आता प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत या ठिकाणी विविध विकासकामे करण्यासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे.
या निधीच्या माध्यमातून मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि इतर सौंदर्यीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. आमदार भोंगळे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे श्रीक्षेत्र धाबा परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यामुळे केवळ धार्मिक पर्यटनच नव्हे, तर परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार असून, श्रीक्षेत्र धाबा हे आता विकासाच्या नकाशावर ठळकपणे दिसणार आहे.







