प्रविण चिडे विरुर तालुका प्रतिनिधी
राजुरा:-विरुर येथील इंडियन पेट्रोल पंपावर मशीन बिघाड झाल्यामुळे मागील चार दिवसांपासून पेट्रोल वितरण पूर्णपणे बंद आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून दैनंदिन प्रवासावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.
पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन जास्त दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. काहींना लांबच्या गावात जावे लागत असल्याने वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे विशेषतः कामगार, विद्यार्थी आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कमल किसन सेवा केंद्र चालकांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. चार दिवसांपासून पंप बंद असतानाही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून मशीन दुरुस्ती करून पेट्रोल पुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















