✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे शैलेंद्र अग्रवाल हे उद्या जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी आणि महाविकास आघाडीच्या प्रमूख नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपला वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधानपरिषद मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संवाद साधणे, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे तसेच महाविकास आघाडीतील समन्वय दृढ करण्याच्या दृष्टीने विशेष चर्चा आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार यांच्याशी संवाद साधून निवडणुकीसाठी एकजूट मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व समर्थकांनी उद्या सकाळी ठीक १० :३० वाजता जनता महाविद्यालयाजवळील दि ग्रँड आयकॉन हॉटेल, चंद्रपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले आहे.













