प्रविण चिडे विरुर तालुका प्रतिनिधी
विरुर : विरुर येथील मेडिकल व्यवसायिक शाहू नारनवरे यांचे सुपुत्र स्पंदन शाहू नारनवरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून विरुर गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विरुर गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्पंदन यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून शिक्षण क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
स्पंदन यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नारनवरे कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेची भावना जपत स्पंदन पुढील काळात मोठी भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.














