20 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्टँडपर्यंत निघणार शांततामय समर्थन रॅली
विरुर स्टेशन प्रविण चिडे,
विरुर प्रतिनिधी : देशातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण व्हावे, तसेच कथित NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या संविधानिक लढ्याला विरुर स्टेशन येथून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 18 दिवसांपासून आमरण उपोषण करत येत असून, त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा म्हणून विरुर स्टेशन येथे ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 20 जुलै सोमवारला रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बसस्टँड, विरुर स्टेशनपर्यंत शांततामय समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता प्रस्थापित करणे, परीक्षा प्रक्रियेत होणाऱ्या कथित गैरव्यवहारांना आळा घालणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हे आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाने व शांततामय पद्धतीने हा लढा उभारण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
रॅलीदरम्यान शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी शांतता, शिस्त आणि संविधानिक मूल्यांचे पालन करत या समर्थन रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे












