✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली-गडचिरोली ट्रायबल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर डे तसेच ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्ना मडावी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच आदिवासी डॉक्टरांचा असा भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, चंद्रपूर GMC चे व्हाइस डीन डॉ. गजेंद्र सुरपाम, आरोग्य भवन जिल्हा शल्य चिकित्सक मुंबई डॉ. दिपचंद सोयाम, डेप्युटी डायरेक्टर आर. एम. ओ. मुंबई डॉ. पुरुषोत्तम मडावी, सिआरपीफ कमांडट अधिकारी डॉ. वसंत कुमरे, डॉ. मिलिंदकुमार कुमरे आणि डॉ. छाया उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी जिल्ह्यातील विविध भागांत कार्यरत असलेले मोठ्या संख्येने आदिवासी डॉक्टर उपस्थित राहिले होते. उपस्थित डॉक्टरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते डॉ. कन्ना मडावी व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व डायरी देऊन करण्यात आलेला सहपत्नीक सत्कार. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी डॉ. मडावी यांच्या दीर्घकालीन वैद्यकीय सेवेचे कौतुक करताना समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
तसेच माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंचावरील सर्व मान्यवरांना डायरी भेट देऊन सन्मानित केले. यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर बांधवांना भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, हा कार्यक्रमातील विशेष उपक्रम ठरला.
आपल्या मनोगतात माजी आमदार डॉ. होळी यांनी आदिवासी समाजातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. गडचिरोली ट्रायबल डॉक्टर असोसिएशनचा हा पहिलाच उपक्रम असून भविष्यात अशा संघटित प्रयत्नांमुळे आदिवासी डॉक्टरांना एक प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली ट्रायबल डॉक्टर असोसिएशनचे डॉ. सचिन मडावी, डॉ. सुनील मडावी, डॉ. चेतन कोवे, डॉ. नितीन मसराम, डॉ. उमेश सिडाम, डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. सोनल कोवे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. तारकेश्वर उईके व पदाधिकाऱ्यांनी केले असून, उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.













