सरपंच अनिल आलाम यांची पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
२०२३-२४ ते २०२४-२५ या कालावधीतील खर्चाची तपासणी करण्याची मागणी
प्रविण चिडे विरुर वार्ताहर
विरूर स्टेशन:-विरूर स्टेशन ग्रामपंचायतीच्या सन २०२३-२४ ते २०२४-२५ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती राजुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनानुसार या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक श्री.गोपाल अण्णाजी नैताम कार्यरत होते. ग्रामपंचायतीचे विविध आर्थिक व्यवहार करताना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने व्यवहार करण्यात आले की नाही याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अंगणवाडीवर सोलर बसविणे, जिल्हा परिषद शाळेत २ प्रोजेक्टर बसविणे/खरेदी करणे तसेच अंगणवाडीमध्ये टीव्ही खरेदी/बसविणे या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

👉
👉यासोबतच या कामांसाठी झालेला खर्च संबंधित बिल-व्हाउचर, बँक व्यवहार निधी/हेड मंजुरी तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. ग्रामपंचायतीच्या नायब सरपंच यांचा दावा असून, काही ऑनलाइन पेमेंट/आर्थिक व्यवहारांमध्ये Digital Signature व Transaction Logs तपासल्यास संबंधित व्यवहारांची अधिक माहिती मिळू शकते असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तत्कालीन ग्रामसेवकांनी आर्थिक व्यवहार करताना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले होते की नाही याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सदर कालावधीतील आर्थिक व्यवहारांची जबाबदारी असलेल्या विद्यमान सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवरही पूर्वपक्षी पद्धतीने निश्चित चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चौकशीअंती करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती ग्रामपंचायतीस देण्यात यावी,अशी मागणीही निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
या निवेदनामुळे विरूर स्टेशन ग्रामपंचायतीतील मागील दोन आर्थिक वर्षांतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून आता पंचायत समिती प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.














