सनथ एचपी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची दररोज गर्दी
अपुऱ्या लोडमुळे घरपोच सेवेलाही फटका
प्रविण चिडे विरुर
विरूर:-ग्रामीण भागातील ग्राहकांना सेवा देताना सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सनथ एचपी गॅस ग्रामीण वितरक, विरूर यांना जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मात्र, सध्या गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एजन्सीसमोर वितरणाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सिलेंडरसाठी ग्राहकांची दररोज एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी होत असून, बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.
सनथ एचपी गॅस ग्रामीण वितरक, विरूर यांच्याकडे राजुरा व कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागासह गोंडपिपरी तालुक्यातील काही ग्रामीण गावांना गॅस वितरणाची जबाबदारी आहे. या विस्तीर्ण कार्यक्षेत्रासाठी दररोज सुमारे एक हजार सिलेंडरची गरज असल्याचे एजन्सी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात दर दोन दिवसांनी सुमारे ३५० सिलेंडरचा एकच लोड उपलब्ध होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे.
लोड आठ वेळा रद्द झाल्याचा दावा
एजन्सीचे संचालक जितेंद्र ताकसांडे यांच्या म्हणण्यानुसार, गॅसचा लोड वारंवार रद्द होत असल्याने वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.आतापर्यंत आठ वेळा लोड कॅन्सल झाल्यामुळे उपलब्ध साठा आणि ग्राहकांची मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून देताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
घरपोच सेवेलाही फटका शुल्क मात्र कायम



अपुऱ्या गॅस पुरवठ्याचा परिणाम घरपोच वितरण सेवेवरही होत आहे. उपलब्ध सिलेंडरचे वितरण करण्याचे नियोजन विस्कळीत होत असल्याने काही ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयात येऊन सिलेंडर घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, घरपोच सेवा देण्यात अडचणी येत असतानाही घरपोच वितरणासाठी आकारले जाणारे शुल्क मात्र ग्राहकांकडून घेतले जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सेवा आणि शुल्क याबाबत संबंधित यंत्रणेने स्पष्टता करून ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
शहरी भागाला २५ दिवस, ग्रामीण ग्राहकांना ४५ दिवसांची प्रतीक्षा
ग्रामीण ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, शहरी भागात सिलेंडरसाठी सुमारे २५ दिवस तर ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांनाही नियमित गॅसची आवश्यकता असताना ग्रामीण ग्राहकांसाठी प्रतीक्षा कालावधी अधिक का असा सवाल उपस्थित होत आहे.
सिलेंडरचा पुरवठा कमी असल्याने एजन्सीच्या कार्यालयासमोर दररोज ग्राहकांची गर्दी होत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्याची मागणी
मोठ्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी असलेल्या एजन्सीला मागणीच्या प्रमाणात नियमित गॅस लोड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना शहराच्या तुलनेत अधिक प्रतीक्षा करावी लागू नये घरपोच सेवा नियमित मिळावी आणि ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या एजन्सीसमोरच पुरवठ्याचे संकट निर्माण झाले असल्याने संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामीण भागासाठी नियमित व पुरेसा गॅस पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















