✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शाळेतील २१७ विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांशी संबंधित विविध विकारांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. आदित्य कोकाटे, डॉ. सोहेल आलम आणि अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या विविध विकारांबाबत माहिती दिली. तसेच डोळ्यांची योग्य निगा कशी राखावी, डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक श्री. सतीश पवार यांनी केले. शाळेसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून सहकार्य केल्याबद्दल माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती यशोध्या उसेंडी यांनी AIIMS नागपूरच्या डॉक्टरांचे व पथकाचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वसतिगृह अधीक्षिका मयुरी सहारे, श्री. मारोती कुरवटकर, श्री. वाय. बी. गोंगल, कु. एस. के. रामटेके, श्री. धनराज चुधरी, श्री. एच. टी. कलसार, श्री. सी. बी. म्हाशाखेत्री आदींनी सहकार्य केले.















