‘संघटन सृजन अभियान’च्या प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक येथे ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या शिबिरात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
संघटनात्मक बांधणी, पक्षाची वैचारिक भूमिका, जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी संवाद यासह विविध विषयांवर या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि जनाभिमुख करण्याच्या दृष्टीने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा जननायक खा. राहुलजी गांधी यांची सुभाषभाऊ धोटे यांनी कौटुंबिक भेट घेतली. यावेळी झालेला स्नेहपूर्ण संवाद आणि राहुल गांधी यांच्या प्रेरणादायी विचारांचे मार्गदर्शन हा धोटे कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. राहुल गांधी यांच्या विचारांमधून मिळालेली प्रेरणा आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन यामुळे काँग्रेसच्या विचारांना अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची नवी ऊर्जा मिळाली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कौटुंबिक भेटीप्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे हे आवर्जून उपस्थित होते. धोटे कुटुंबीयांची राहुल गांधी यांच्यासोबत झालेली ही भेट काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नव्या दिशेने पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरली.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवक व सर्वसामान्य नागरिकांना पक्षाच्या विचारांशी जोडणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे संघर्ष उभारणे, या दिशेने आगामी काळात कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.‘संघटन मजबूत, कार्यकर्ता सक्षम आणि जनतेशी नाते अधिक दृढ’ या भूमिकेतून काँग्रेसच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी धोटे कुटुंबीयांसह काँग्रेस कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.















