प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीची ओळख कधी काळी “देवनगरी” म्हणून होती. तीच ओळख आता पुसली जाऊन भद्रावती आता “हत्या नगरी” म्हणून उदयास येत आहे.
भद्रावतीत दर पाच-सहा महिन्यांनी हत्याकांड घडतच आहे. बहुचर्चित ITI समोरील मुंडके नसलेले प्रेत, झिंगुजी वार्डातील भावाने बहीण व आईची केलेली हत्या, भंगाराम वार्डात एका युवकाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने केलेली हत्या या घटना विसरत नाही तोच, २३ सप्टेंबरला नागमंदिर चौकाजवळ भर रस्त्यात सकाळी ७.३० वाजता एका युवकाला मोटारसायकल अडवून मानेवर वार करून जागेवरच ठार करण्यात आले. भद्रावतीला जणू सहा महिन्यांनी रक्तरंजित होळी होतेच.
पोलीस स्टेशन स्थलांतरानंतर गुन्हेगारीला ऊत
सन २०२२ ला शहराच्या बाहेर पोलीस स्टेशन गेल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून येथे अनेक अवैध धंद्यांचा महापूर पाहायला मिळतो.

भद्रावती पोलीस स्टेशनच्या कारभाराबाबत जनतेत प्रचंड असंतोष असून नागरिक तर पोलीस स्टेशनलाच अवैध धंद्यांचे माहेरघर मानतात. “भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये कायदा विकत मिळतो, अवैध धंदे जोरात आणि पोलीस कोमात,” असे अनेक तर्क-वितर्क पोलिसांच्या कामगिरीवर केले जातात.
शहरात अनेक अवैध धंदे जोरात सुरू आहेत – मुख्य रस्त्यावर अनियंत्रित वाहतूक, जड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, अंमली पदार्थ (गांजा) विक्री, शहराबाहेरील ढाब्यांवर अवैध दारू विक्री, पिंपळा रोडवरील पिपराडे मंगल कार्यालय परिसरात हाय-वेला लागून खुलेआम सट्टापट्टी, लॉजमध्ये वेश्या व्यवसाय इ. अवैध धंद्यांची चौकशी करून कडक कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.
मध्यवर्ती पोलीस चौकीची मागणी
शहराच्या मध्यभागी पोलीस स्टेशन होते तेव्हा कायदा व सुव्यवस्था नियंत्रित होती. शहराबाहेर पोलीस स्टेशन गेल्यापासून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मध्यभागी सराफा मार्केट आहे, मोठमोठी प्रतिष्ठाने आहेत. पूर्वी मध्यरात्री दोन-तीन वेळा पोलीस गस्तीचे सायरन ऐकू यायचे. आता तर ऐकायला कान आहेत पण सायरन नाही.
शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांची भीती दूर करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भद्रावती शहराच्या मध्यभागी आंबेडकर चौक ते नागमंदिर चौकापर्यंत पोलीस चौकी उभारणे अत्यंत आवश्यक आहे. चौकी उभारून नागरिकांना अभय देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.














