जेष्ठ काँग्रेस नेते अशोकराव देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत लेख
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-राजुरा तालुक्याच्या सामाजिक, सहकार आणि सार्वजनिक जीवनात गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने कार्यरत असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. अशोकराव देशपांडे हे पदापेक्षा जनसेवेला आणि प्रसिद्धीपेक्षा लोकहिताला महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. शेतकरी, शेतमजूर, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांचे असलेले नाते आजही तितकेच दृढ आहे.
सन १९९३ मध्ये राजुरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना, तत्कालीन व विद्यमान नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेघर नागरिकांच्या शिवाजीनगर परिसरातील जमीन व घरांच्या पट्टेवाटपाच्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गरजू नागरिकांना हक्काचे घर आणि जमिनीचा आधार मिळवून देण्याच्या या कार्यातून त्यांच्या लोकाभिमुख कार्याची दिशा स्पष्ट झाली.
सन १९९८ ते २०११ या कालावधीत भुविकास बँकेचे संचालक म्हणून त्यांनी राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक मदत पोहोचविण्यासाठी काम केले. विहिरींसाठी कर्जवाटप, पीककर्ज आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांशी संबंधित विविध उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहकार हे केवळ संस्थात्मक काम नसून शेतकरी आणि सामान्य माणसाच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून त्यांचा हा प्रवास सुरू राहिला.
सध्या ते राजुरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादितचे संचालक, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, वरूर रोडचे संचालक तसेच केंद्रीय व राज्य सरकारी गृह निर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष म्हणूनही ते संघटनात्मक जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, अनेक वर्षांच्या सार्वजनिक आणि सहकार क्षेत्रातील कार्यानंतरही “आपण केलेल्या कामाचा गाजावाजा करण्यापेक्षा तो लाभ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे” ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा खरा परिचय त्यांच्या पदांपेक्षा त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामातूनच अधिक ठळकपणे दिसून येतो.
या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना स्व. मामुलकर साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दादापाटील लांडे, तत्कालीन संचालक को-ऑपरेटिव्ह बँक यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि कुशल नेतृत्व लाभले. या नेतृत्वाच्या संस्कारातून लोकसेवा, सहकार आणि संघटनात्मक कार्याची वाटचाल अधिक व्यापक होत गेली.
सहकारातून शेतकऱ्यांना आधार, सामाजिक कार्यातून गरजूंना मदतीचा हात आणि सार्वजनिक जीवनातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देत मा. अशोकराव देशपांडे यांनी आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा हा सेवाभावी प्रवास यापुढेही अधिक जोमाने सुरू राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर सामाजिक कार्याची ऊर्जा लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा.

मा. अशोकराव देशपांडे यांना वाढदिवसानिमित्त सुदृढ आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा! 🎂💐आपल्या जनसेवेचा ध्यास कायम राहो, सहकारातून लोककल्याणाचा प्रवास अखंड सुरू राहो! हीच या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रा. प्रफुल्ल शेंडे.
राजुरा.













