आत्महत्येचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल; मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. वडिलांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या मुलानेच वडिलांचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पोलीस प्रेस नोटनुसार, दिनांक 20 मे 2025 रोजी रात्री 1 ते 1.30 वाजताच्या दरम्यान राजुरा तालुक्यातील चाळी शेतशिवार येथे शंकर परशुराम काळे (वय 60) यांच्याबाबत ही घटना घडली होती. सुरुवातीला राजुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरण क्रमांक 44/2025 अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 194 प्रमाणे नोंद करून चौकशी सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, शवविच्छेदनाच्या अंतिम वैद्यकीय अहवालातून मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून गळा दाबल्यामुळे (Hyoid Bone Fracture) झाल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला मृताच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खोटी माहिती देत बनाव रचून पोलिसांची दिशाभूल केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मृताचा मुलगा निखिल शंकर काळे (वय 31, रा. धिडशी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) याच्याकडे पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या फिर्यादीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. 804/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 240 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पोलीस पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.














