जनसंपर्क कार्यालयात दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– देश प्रथम या भावनेने देशासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान, आयर्न लेडी, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने दोन्ही महान व कणखर नेत्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयाजवळील राजुरा विधानसभा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. देशाच्या राजकीय इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्व, देशाच्या सार्वभौमत्वासाठी घेतलेले ठाम निर्णय आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी केलेले ऐतिहासिक कार्य यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. या महान नेत्यांचे विचार, राष्ट्रनिष्ठा आणि लोकसेवेची प्रेरणा समाजजीवनात सदैव मार्गदर्शक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कुर्मदास पावडे, कवडू सातपुते, सुदर्शन दाचेवार, भास्कर चौधरी, प्रणय लांडे, अशोक राव, हेमंत झाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















