गॅस एजन्सी गडचांदूरचा भोंगळ कारभार उघड
कोरपना :-कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गॅस सिलेंडरच्या टंचाईचा गैरफायदा घेत नागरिकांची सर्रास फसवणूक होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. गडचांदूर येथील इंडियन गॅस एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ग्राहकांच्या नावावर बिल काढून सिलेंडर मात्र ‘ब्लॅक’मध्ये विक्रीसाठी वळवले जात असल्याचा आरोप जोर धरत आहे.
रामनगर (बिबी) येथील रहिवासी मोहम्मद आलम खान यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दिनांक 16 मार्च 2026 रोजी गॅस सिलेंडर बुक केला होता. त्यानंतर 18 मार्च रोजी डिलिव्हरी मॅन अरविंद याने फोन करून ओटीपी मागवला. सिलेंडरची तातडीची गरज असल्याने ग्राहकाने ओटीपी दिला; मात्र अपेक्षेप्रमाणे सिलेंडर पोहोचवण्यात आले नाही. उलट, ग्राहकाच्या मोबाईलवर बिल जनरेट झाल्याचे दिसून आले—पण सिलेंडरचा पत्ता नाही!
विशेष म्हणजे, यापूर्वी सिलेंडर देतानाच ओटीपी घेतला जात होता. मात्र आता आधीच ओटीपी घेऊन बिल तयार केले जात असल्याने संशय अधिक गडद होत आहे. ग्राहकांच्या नावावर व्यवहार पूर्ण दाखवून प्रत्यक्षात सिलेंडर इतरत्र विकले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—डिलिव्हरी करताना कोणतेही अधिकृत बिल न देता, ग्राहकांकडून 50 रुपये ‘पोहोच शुल्क’ म्हणून आगाऊ रक्कम घेतली जात असल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागात ही पद्धत सर्रास सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे.
सध्या ग्रामीण भागात गॅसचा मोठा तुटवडा असल्याने काही ठिकाणी सिलेंडर जास्त दराने (ब्लॅकमध्ये) विकले जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या नावावर बिल काढून सिलेंडर दुसरीकडे वळवण्याचा प्रकार होत असल्यास, तो अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो.
या सर्व प्रकारामुळे सामान्य ग्राहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याऐवजी नागरिकांची लूट सुरू असल्याची भावना तीव्र होत आहे.
आता प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक आहे. संबंधित एजन्सीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे, तसेच ग्रामीण भागातील गॅस वितरण प्रणाली पारदर्शक करणे गरजेचे झाले आहेत.
‘👉’मोबाईल द्वारे 14 मार्च ला सिलेंडर बुक केलेत 15 मार्चला सिलेंडर डिलेव्हर झाल्याचा मेसेज आला प्रत्यक्ष सिलेंडर मिळाले नाही तहसील कार्यालयाला तक्रार केल्यानंतर कांबळे साहेबांच्या हस्तक्षेपानंतर दिनांक 21 मार्चला 5 तास रांगेत उभे राहून सिलेंडर घ्यावे लागलेत. एजन्सी च्या बोगस कारभारामुळे मानसिक त्रास होत आहे इंडियन ऑइल च्या अधिकाऱ्यांनी यापुढे लक्ष देण्याची गरज आहे:-
”दिलीप पांडे, नांदा
गॅस धारक
👉”16 मार्चला सिलेंडर बुक केले 18 मार्च रोजी ओटीपी घेतला सिलेंडर डिलेव्हर झाल्याचा मेसेज आला प्रत्यक्षात सिलेंडर मिळाले नाही याबाबत विचारणा केली असता सध्या स्टॉप नाहीत असे सांगण्यात आले तक्रार केल्यानंतर एजन्सी कडून सांगण्यात आले चुकी झाली. अजून पर्यंत सिलेंडर पोचता करून देण्यात आले नाही सिलेंडरची बेभाव विक्री सुरू आहे काळाबाजारी थांबविण्याकरिता तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
:-मो. आलम खान, रामनगर(बिबी)
गॅस ग्राहक








