💢आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-दि. २९
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ०१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २७ मार्च रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जिवती या चारही तालुक्यांतील विविध तांडा वस्त्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधांची कामे मार्गी लागणार आहेत.
❇️या निधीच्या उपलब्धतेसाठी आमदार देवराव भोंगळे यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण आणि भक्कम पाठपुरावा केला होता. मतदारसंघातील प्रत्येक तांडा आणि वस्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचावी, या उद्देशाने त्यांनी या कामांच्या मंजुरीसाठी इमाव व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निधी खेचून आणला आहे.
आमदार भोंगळे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळेच आज विविध ठिकाणच्या १४ विविध कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे केवळ भौतिक सुविधाच उपलब्ध होणार नाहीत तर वस्तीतील नागरिकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार भोंगळे यांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
💢शासकीय निर्णयानुसार, राजुरा तालुक्यातील बापूनगर, चंदनवाही आणि भुरकुंडा खुर्द येथे अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच जिवती तालुक्यातील सेवादासनगर, टाटाकोहाड, पाटागुडा, आनंदगुडा व शंकरपठार या ठिकाणी सीसी रस्ते, बंदिस्त नाली आणि भव्य सभागृह बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. कोरपना तालुक्यातील पिपर्डा आणि धानोली तांडा येथे सिमेंट नाली व रस्त्यांची कामे होतील, तर गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा, नंदवर्धन, शिवणी देशपांडे आणि धाबा येथेही मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे.








