✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदूर:-एकीकडे ‘घरकुल’ या पवित्र नावाचा आडोसा घ्यायचा आणि दुसरीकडे रेतीची अवैध तस्करी करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळायचा, असा भयंकर प्रकार भोयगाव-भारोसा घाट परिसरात उघडकीस आला आहे. याच रेती तस्करांच्या एका सुसाट ट्रॅक्टरने बाखर्डी येथील ३८ वर्षीय श्रीकांत राजूरकर यांना चिरडले असून, गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून “प्रशासन नेमके कोणाचे लाड पुरवतेय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. श्रीकांत राजूरकर हे आपल्या कामावरून जात असताना, निमणी येथे रेती खाली करून अतिवेगाने परतणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर चक्क श्रीकांत यांच्या अंगावरून गेला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तब्बल तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांना थोडा शुद्धीवर आला आहे, मात्र त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
महसूल विभाग की रेती तस्करांचे ‘एजंट’?
भोयगाव-भारोसा घाटावर सध्या रेती चोरीचा महापूर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रेती तस्कर चक्क विना नंबरप्लेटचे ट्रॅक्टर वापरत आहेत, जेणेकरून अपघात झाला किंवा कारवाईची वेळ आली तर ओळख पटू नये. या सर्व प्रकाराला स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे पूर्णतः पाठबळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. “साहेबांच्या” आशीर्वादाशिवाय विना नंबरचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या नाकाखालून सुसाट कसे धावू शकतात? हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.
❌या अपघातामुळे नागरिकांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना प्रश्न उपस्थित केले आहे
भारोसा येथील संबंधित ट्रॅक्टर मालकाने आपल्या ट्रॅक्टरची रितसर नोंद तहसील कार्यालयात केली आहे का? की सर्व काही ‘सेटिंग’वर सुरू आहे?
अपघातग्रस्त ट्रॅक्टरसह इतर अनेक ट्रॅक्टर ‘ॲग्रीकल्चर पासिंग’चे आहेत. शेतीच्या कामासाठी घेतलेले ट्रॅक्टर रेती तस्करीसाठी वापरले जात असताना परिवहन विभाग आणि महसूल विभाग झोपा काढत आहे का?
दोषी कोण?: घरासाठी रेती नेण्याच्या नावाखाली व्यावसायिक लूट सुरू आहे, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये?
नागरिकांचा रोष शिगेला
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून, महसूल प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही कठोर भूमिका घेतलेली नाही. “एका गरीब कुटुंबातील तरुणाचा संसार उद्ध्वस्त झाला असताना प्रशासन गप्प का?” असा सवाल आता बाखर्डी येथील नागरिक विचारत आहेत. जर तातडीने या विना नंबरप्लेटच्या ट्रॅक्टर्सवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
⏏️मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
कोरपना तालुक्यातील मोफत घरकुल रेती योजने मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याची, सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते झोपेचे सोंग घेऊन असलेल्या महसूल विभागाने कुठलीही दखल घेतल्याचे दिसत नाही महसूल विभाग कारवाई करत नसल्याने निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
” रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकला मोठी धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती असून या युवकाला गंभीर दुखापत झाली असून नागपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. परिवाराकडून फिर्याद प्राप्त होताच योग्य कारवाई केली जाईल:-शिवाजी कदम
ठाणेदार गडचांदूर










