✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज एन. डी. हॉटेल येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पक्ष संघटन अधिक मजबूत, सक्षम व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक मा. संतोषजी कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक मा. अभयजी छाजेड, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे, शहर जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी लहामगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी समन्वय, बूथस्तरावरील संघटन वाढविणे, पक्ष संघटनेत आवश्यक बद्दल तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना निरीक्षक मा. संतोषजी कोलकोंडा यांनी सांगितले की, संघटन सुदृढ असेल तरच पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय होऊन पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवावी. तर महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक मा. अभयजी छाजेड यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज आहे. संघटन सृजन अभियानातून पक्षाला नवचैतन्य मिळेल आणि आगामी काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील.
खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्यासाठी एकजूट व सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. तर जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे आणि जिल्हा शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.



💢या बैठकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून पक्ष अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन जिल्हातील पत्रकारांना संघटन सृजन अभियानाबद्दल माहीती देण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष याशिम शेख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, एनएसयूआय अध्यक्ष शफाक शेख यासह मान्यवर उपस्थित होते.







