✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-राजुरा शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत येथील सैफ समीर पठाण याची खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय सेपकटकरा संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे राजुरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सैफ पठाण हे रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य स्वर्गीय समिर पठाण यांचे सुपुत्र असून सध्या ते चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथे पदवी शिक्षण घेत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने त्यांनी खेलो इंडिया सेपकटकरा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी केलेल्या प्रभावी आणि दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय सेपकटकरा संघात निवड करण्यात आली आहे.
लवकरच जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेपकटकरा स्पर्धेत राजुराचा सैफ पठाण गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करणार असून त्याच्यासोबत नाशिक चा सुकुमार तिवारी, नांदेडचा सुद्देश कांबळे, वरोरा चा मंथन दिवटे, नागपूरचा पियुष, गडचांदूर चा प्रितम यांचा समावेश या संघात असून चंद्रपूर येथील क्रीडा प्रशिक्षक नरेश चंदेल त्यांचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सैफ च्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी यशस्वी कामगिरी करत राजुरा व गोंडवाना विद्यापीठाचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.






