उत्पादन शुल्क विभागाच्याच पत्राने पितळ उघडे; ‘नोकर’ कोण अन् ‘मालक’ कोण याचा हिशोब द्या
प्रतिनिधी / राजेश येसेकर
भद्रावती : चिचोर्डीतील देशी दारू दुकानाच्या परवान्यात मोठा घोळ समोर आला आहे. कागदावर मालक बहादे, पण खरा ‘बॉस’ नरेश रामलू मार्कवार उर्फ “नरेश अण्णा”? उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा-3 कार्यालयानेच भद्रावती पोलिसांना पाठवलेल्या पत्राने या ‘बेनामी’ कारभाराचे बिंग फुटले आहे.
‘नोकरनामा’ अण्णाचा, दुकान बहादेंचे – मग चालवतंय कोण?
धक्कादायक बाब म्हणजे, परवाना बहादे यांच्या नावावर असताना, शासकीय पत्रव्यवहारात मात्र नरेश अण्णांचा ‘नोकरनामा’ जोडला गेलाय. उत्पादन शुल्क विभागाने थेट अण्णांच्या नावावरील दाखल, प्रलंबित आणि निकाली गुन्ह्यांची कुंडलीच पोलिसांकडे मागितली आहे.
👉याचा अर्थ सरळ आहे – कायद्याला वळसा घालून दुसऱ्याच्या नावावर दुकान, आणि पडद्यामागून सूत्रे दुसऱ्याच्याच हातात? “फक्त सहीपुरता मालक बहादे, आणि कोट्यवधींचा मलिदा खातोय कोण?” हा जळजळीत सवाल आता चिचोर्डीकर विचारत आहेत.
परवानाधारक एक, आणि प्रत्यक्षात दुकानाचा ‘रिंगमास्टर’ दुसराच – ही बाब उघडकीस येऊनही प्रशासन अजूनही मूग गिळून गप्प का? पोलिस अहवाल आल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग कोणावर कारवाईचा बडगा उगारणार, की हे प्रकरणही नेहमीप्रमाणे ‘मॅनेज’ होणार?
या संशयास्पद हालचालींमुळे संपूर्ण परवाना प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता जनताच विचारतेय – “दारूच्या धंद्यातला हा ‘डमी’ खेळ बंद होणार की नाही?”
————— बॉक्स——–
चिचोर्डीत दारू परवान्याचा मोठा घोटाळा उघड! नाव बहादेंचं, दुकान चालवतो ‘नरेश अण्णा’? उत्पादन शुल्क विभागानेच पोलिसांकडे मागितली अण्णांच्या गुन्ह्यांची माहिती. बेनामी कारभार की कायद्याला ठेंगा? प्रशासन कारवाई करणार का?













