✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ ही अभिनव सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सुविधेचे नुकतेच दिनांक 30 जुलै रोजी उद्घाटन झाले. या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ५२ ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ प्राप्त झाली असून, यामुळे जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रुग्णवाहिकांची इंधन समस्या कायमची सुटण्यास मदत होणार आहे.
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि गडचिरोलीसाठी फायदा:
*इंधन खरेदीत पारदर्शकता व वेळेची बचत:
- पूर्वी शासकीय वाहनांना वेळेवर इंधन न मिळाल्यामुळे येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. पेट्रोकार्डमुळे रोख व्यवहारांऐवजी थेट डिजिटल पेमेंट होईल, ज्यामुळे आर्थिक पारदर्शकता येईल आणि इंधनासाठी होणारा अनावश्यक विलंब टळेल. आता सर्व रुग्णांसाठी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध
यापूर्वी १०२ रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने माता व बालकांसाठी वापरली जात होती. परंतु आता ही सेवा गडचिरोलीतील सर्वच गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सेवा १०८ रुग्णवाहिका सेवेला एक सक्षम पर्याय म्हणून काम करेल.
दुर्गम भागातील रुग्णांना तात्काळ मदत:
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या सहकार्याने ही सुविधा पुरवण्यात येत आहे. गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात रुग्णवाहिकांना वेळेवर इंधन मिळाल्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना जलद आरोग्य सेवा मिळणे शक्य होणार आहे.
”आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता येईल आणि रुग्णवाहिका २४ तास तत्पर राहून नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करतील.”
— प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री
मुंबईत झालेल्या या राज्यस्तरीय उद्घाटन प्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व HPCL चे प्रतिनिधी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.गडचिरोली जिल्ह्यातील ५२ रुग्णवाहिकांना हे पेट्रोकार्ड मिळाल्यामुळे जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य यंत्रणा आता अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होणार आहे.













