✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) प्रशिक्षणाची आज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र पोरला अंतर्गत येणाऱ्या वाकडी उपकेंद्रात सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे माजी आरोग्य सेवा संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले.
या पाहणी दौऱ्यामध्ये राज्याचे माजी आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, माजी आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, नागपूर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोगुलवार आणि गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद:
या भेटीदरम्यान मान्यवर अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. आतापर्यंतच्या सत्रांमध्ये शिकवण्यात आलेल्या प्रत्येक विषयावर प्रशिक्षणार्थींना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची आणि आकलनाची चाचपणी करण्यात आली. तसेच, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) बाबत थोडक्यात:
सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) हा आरोग्य विभागाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

उदिष्ठ ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या घराजवळ, दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
आरोग्यवर्धिनी केंद्रे (Health and Wellness Centres): या उपक्रमांतर्गत गावपातळीवरील उपकेंद्रांचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये’ रूपांतर केले जात आहे.
विस्तारित सेवा: पूर्वी केवळ माता व बाल संगोपन आणि काही संसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित केले जात होते. परंतु CPHC अंतर्गत आता १३ प्रकारच्या विविध आरोग्य सेवा दिल्या जातात.
प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर: केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नयेत म्हणून ‘प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक’ (Preventive and Promotive) आरोग्यावर या अंतर्गत विशेष लक्ष केंद्रित केले जाते.या विस्तारित सेवा जनतेपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठीच आरोग्य कर्मचाऱ्यांना हे विशेष CPHC प्रशिक्षण दिले जात आहे.














