बँकिंग व्यवहार, डिजिटल सेवा आणि बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी घेतले जाणून
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-इन्फंट जीजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राजुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना बँकेची कार्यपद्धती, आर्थिक व्यवहार, डिजिटल बँकिंग सेवा तसेच बचतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या भेटीदरम्यान बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीकुमार यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या विविध व्यवहारिक सेवांची सविस्तर माहिती दिली. खाते उघडण्याची प्रक्रिया, बँकिंग व्यवहार, डिजिटल बँकिंग, विविध ऑनलाइन सेवा तसेच आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बँकेचे सहकारी अक्षय चौधरी, संतोष कुमार, आकाश बानकर व मोनिका कोवे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत बँकेतील विविध विभाग व सेवांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून बँकेच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वर्गशिक्षिका सौ. रामकली शुक्ला तसेच सुशील वासेकर उपस्थित होते. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना बँकेच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचे ज्ञान मिळाले. तसेच आर्थिक साक्षरता, बचतीची सवय आणि आधुनिक डिजिटल बँकिंग व्यवहार याबाबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.














