खुनाचा कट उधळला; पिस्तूल, मॅग्झीन व 10 जिवंत काडतुसे जप्त
चंद्रपूर प्रतिनिधी✍️राजेश येसेकर
चंद्रपूर:-नागपंचमीच्या दिवशी मोठा गुन्हा किंवा खुनाचा कट रचण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत जेरबंद केले आहे. आरोपीच्या घरातून पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 10 जिवंत काडतुसे असा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वरोरा शहरात खळबळ उडाली आहे.
दि. 17 ऑगस्ट 2026, सोमवार रोजी नागपंचमी निमित्त पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाईसाठी एलसीबीचे पथक वरोरा डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. यावेळी पोलीस स्टेशन वरोरा परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,
सत्यम टॉकीजच्या मागे, वड्डार वस्ती, वरोरा येथे राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय 46) हा कुठल्यातरी गंभीर दखलपात्र गुन्हा, म्हणजेच खुनाचा कट करण्याच्या तयारीत असून त्याने राहत्या घरी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून ठेवले आहे.

ही खात्रीशीर माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तात्काळ वड्डार वस्ती गाठून पंचांसमोर आरोपीच्या घरावर धाड टाकली.
झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:1 पिस्तूल, 2 मॅग्झीन, 10 जिवंत काडतुसे,1 मोबाईल असा एकूण 89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक 902/2026, कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा (Arms Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक कांग्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शस्त्र बाळगून घातपाताचा कट रचणाऱ्या गुन्हेगाराला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.














