सरपंच अनिल आलाम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन
प्रविण चिडे विरुर तालुका प्रतिनिधी
विरूर:-विरूर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती खंबाडा शेतशिवारात आहे. मात्र या शेतशिवारात जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तिसरा रेल्वे मार्गही असल्याने रेल्वे गाड्यांची वर्दळ आणि वेग लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खांबाडा शेतशिवारात जाण्यासाठी रेल्वे मार्गाखाली अंडरपास पुलिया मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात विरूर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल आलाम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
खांबाडा शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दररोज रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. शेतीची अवजारे, तसेच जनावरे घेऊन रेल्वे रुळ ओलांडताना शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण होतो. याच ठिकाणी यापूर्वी रेल्वे अपघातात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून अनेक जनावरांचाही मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे मार्गाची वाढलेली वाहतूक, तिसरा रेल्वे रुळ आणि गाड्यांचा वेग यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंडरपास पुलियाची सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.
अंडरपास पुलिया झाल्यास खांबाडा शेतशिवारातील शेतकऱ्यांना सुरक्षितपणे शेतात जाता येईल. तसेच शेतीची कामे करताना जनावरे व वाहने रेल्वे रुळावरून नेण्याचा धोका टाळता येणार आहे. त्यामुळे या मागणीचा रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करून अंडरपास पुलिया मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजुरा नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे सरपंच अनिल आलाम उपसरपंच प्रीती पवार,ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष सुरेश पावडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता इग्रपावर, रत्नमाला उपरे रुदा पेंदोर संगेश पावडे राजू इग्रपवार कृष्णा कोवे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
खांबाडा शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंडरपास पुलियाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढील पाठपुराव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.














