आश्रमशाळा शिक्षकांनी काळया फिती लावून नोंदविला निषेध
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांना शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी रात्रपाळीत उपस्थित राहण्यासाठी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने होत असलेल्या बळजबरी व अन्यायकारक धोरणाच्या विरोधात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून शिक्षकांनी शनिवार ,५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळया फिती लावून तीव्र निषेध नोंदविला.

गडचिरोली,कळवण,नाशिक,शहापूर तसेच इतर प्रकल्पातील निर्दोष शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिक्षक दिनी काळया फिती लावून निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेच्या या आवाहनास शिक्षकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
आश्रमशाळा संहितानुसार अधीक्षक व अधिक्षिका यांनी त्यांच्याकडील प्रभाराची जबाबदारी एकमेकांकडे देणे असताना प्रभार शिक्षकांकडे दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली शिक्षकांच्या रात्र पाळ्या लावून जणू पहारेकर्याची जबाबदारी दिल्या जात आहे.सेवाशर्ती व कामाचे तासाचे उल्लंघन होत आहे. महिला हक्क, विशाखा समिती मार्गदर्शक तत्वे व सुरक्षा नियमाचे उल्लंघन होत आहे.घटनात्मक व मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. कौटुंबिक जीवन, आरोग्य व पुरेशी विश्रांती यांवर आघात होत आहे.शिक्षक व शिक्षिकांवर रात्री व्हिडिओ देखरेख करून गोपनीयता व सन्मानाचे उल्लंघन होत आहे.आश्रमशाळेत काही अप्रिय घटना घडल्यास दोषारोप सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षक,मुख्याध्यापक, अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्या जात आहे.महिला शिक्षकांना रात्री नियमबाह्य कामाची सक्ती केली जात आहे असा संघटनेचा आरोप आहे.या व इतर अन्यायकारक कारवाई व दडपशाहीच्या निषेधार्थ आश्रम शाळेतील शिक्षक आता प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध एकवटले आहेत.
राज्यभरात आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे व्हाट्सअप ग्रुप तसेच सोशल मीडिया मध्ये प्रकल्प प्रशासनाच्या विरुद्ध संतापजनक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.प्रशासनाने आश्रम शाळा शिक्षकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. शिक्षकांची प्रतिमा मलीन करून आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल? असा प्रश्न संघटनेने केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्रम शाळेतील शिक्षकांचा सत्कार तर दूरच उलट शिक्षक दिनीच काळ्याफिती लावून निषेध करण्याची पाळी शिक्षकांवर यावी ही दुर्दैवी बाब असून याची वेळीच दखल आदिवासी विकास विभाग प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.आदिवासी विकास विभाग प्रशासनाच्या वतीने आश्रम शाळा शिक्षकांना नियमबाह्य, दडपशाही व अन्यायकारक अशैक्षणिक कामाचा अतिरिक्त भार देणे यापुढे थांबविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संघटनेने केलेला आहे असा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी. भामरे यांनी दिला आहे.















