महाकाय खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त-सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-राजुरा तालुक्यातील चुनाळा–अंतरगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १६ वरील सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, चनाखा, सातरी ते चुनाळा दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले महाकाय खड्डे आणि क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, अवजड वाहने खड्ड्यांत अडकून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही घडत आहेत. याचा फटका विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी तसेच रुग्णवाहिकांना बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


येत्या सात दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवून दर्जेदार डांबरीकरणाचे काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर सिंधी ते चुनाळा मार्गावर बेमुदत ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती राजुराचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना माजी सभापती तथा चनाखाचे ग्रामपंचायत सदस्य विकास देवाळकर, चिंचोली चे माजी सरपंच धनराज चिंचोलकर, सिंधी चे माजी उपसरपंच रामभाऊ धुमणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा विहिरगावचे माजी उपसरपंच माजी इर्शाद शेख, नलफडी चे माजी सरपंच अमित टेकाम, कवडू सातपुते यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.















