✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात जेन-झीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी केली.


उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत बल्लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई तसेच संबंधितांना न्याय देण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या कराच्या पैशांचा योग्य वापर होणे आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सुभाष धोटे यांनी स्पष्ट केले.
या भेटीप्रसंगी बल्लारपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, बल्लारपूर नगर परिषदेचे गटनेते देवेंद्र आर्या, संतोष इटणकर, सुरेश चहारे, अखिल गेडाम, संजय खांडीलकर, संघर्ष रेगुटावार यांच्यासह कोठारी ग्रामस्थ, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















