✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या विकास आराखड्याच्या संदर्भात भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार व विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ चे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्किट हाऊस, गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ चा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ चे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.
यासाठी दि. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती व सिंचन, उद्योग व गुंतवणूक, पर्यटन, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवक व क्रीडा, वनाधारित अर्थव्यवस्था, ग्रामविकास, PESA व वनहक्क, आदिवासी विकास आदी विषयांवर मान्यवरांनी आपल्या सूचना व संकल्पना मांडल्या.
या सर्व सूचनांचा विचार करून भविष्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची दिशा निश्चित करणारा आराखडा तयार करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकार परिषदेत मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, गडचिरोलीकडे नैसर्गिक साधनसंपत्ती, वनसंपदा, बांबू, कृषी उत्पादन, वनौषधी, पर्यटन आणि मानवी संसाधनांची मोठी ताकद आहे. या संपत्तीचे योग्य नियोजन, स्थानिक पातळीवर प्रक्रिया व मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ हा केवळ एक दस्तऐवज नसून जिल्ह्याच्या भविष्यासाठी सामूहिक सहभागातून उभा राहणारा विकासाचा संकल्प आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश दोन दिवसीय कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची माहिती गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा होता.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, माजी पं.स. उपसभापती विलास दशमुखे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (महिला शाखा) जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहराध्यक्ष आरती कोल्हे, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, काशिनाथ देवघडे, योगेश कुमरे आदी उपस्थित होते.















