✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
आलापल्ली:-जिथे शिक्षणाचा दिवा लावणे म्हणजे वाळवंटात झाड लावण्यासारखे कठीण होते, अशा अतिदुर्गम भागात जन्म घेऊन, गरीब कुटुंबातून शून्यातून विश्व निर्माण करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. एस. ए. झोडे सर.
कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते, अडाणीपणाचा अंधार घरात दाटला होता. पण म्हणतात ना, “हिऱ्याची पारख जोहरीच करतो” तसे झोडे सरांनी शिक्षणाचा हिरा शोधला आणि आज ते शिक्षण क्षेत्रातील सिंगम म्हणून ओळखले जातात.
विज्ञाननिष्ठ, विद्यार्थीनिष्ठ, सरळ स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व ही त्यांची ओळख. ते खऱ्या अर्थाने उपक्रमशील शिक्षक आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. त्यांचे कार्य म्हणजे “बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणे”.


या शैक्षणिक सत्रात त्यांनी सादर केलेल्या “साधे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे” या नाविन्यपूर्ण उपक्रमाने परीक्षकांची मने जिंकली. या उपक्रमात त्यांनी टाकाऊतून टिकाऊ साहित्य वापरून विज्ञान विद्यार्थ्यांच्या हातात खेळण्यासारखे सोपे करून दाखवले.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “शिक्षक ध्येय” या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार – 2026 ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा आलापल्ली येथील “मेगा इव्हेंट” मध्ये शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. “गुणवंताला गुणाचीच किंमत” या उक्तीप्रमाणे हा पुरस्कार त्यांना RCM चे स्टॉर सफायर कोअर लिडर मा. प्रा. श्री. एस. अत्री सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर स्टार एमरॉल्ड मा. मनोद्र बाला सर, स्टार पर्ल मा. प्रकाश तलांडे सर, स्टार पर्ल मा. बाटवे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
एका गरीब घरातला दिवा आज हजारो विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखा प्रकाश देत आहे. डॉ. झोडे सरांनी हे सिद्ध केले आहे की, “प्रयत्नांती परमेश्वर” आणि “जिद्द असेल तर दगडालाही पाझर फुटतो”.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.















