✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
जिवती:- देशातील पत्रकारांवर वाढत्या स्वरूपात होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या, धमक्यांच्या आणि कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आणि प्रभावी पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर वृत्तांकन करताना अनेक पत्रकारांना विविध प्रकारच्या दबावाला, धमक्यांना किंवा अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यांनी पुढे नमूद केले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. मुक्त, निर्भय आणि निष्पक्ष पत्रकारिता ही या अधिकाराचा महत्त्वपूर्ण भाग मानली जाते. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्यांचे निर्भयपणे पालन करता यावे, यासाठी स्वतंत्र कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सय्यद शब्बीर जागीरदार यांनी केंद्र सरकारला पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि पत्रकारितेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष तरतुदी असलेला पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याचे आवाहन केले. तसेच पत्रकारांच्या तक्रारींची जलद दखल घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
पत्रकार संरक्षण संघाने ही मागणी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अधिक बळकट करण्याच्या आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.












