✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
मुंबई -“आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७”* च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ आणि प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता प्रशासनाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली व मूलचेरा तालुक्यांतील नागरिकांना जलद व प्रभावी प्रशासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी अहेरी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यात आले. मात्र, या कार्यालयाला शासनाच्या नियमानुसार आवश्यक प्रशासकीय व इतर अधिकार, पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कृती निर्माण समिती’ चे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथील मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

गडचिरोलीचा भौगोलिक विस्तार मोठा असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामांसाठी गडचिरोली येथे यावे लागते. त्यामुळे अहेरी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यामागील उद्देश प्रत्यक्षात साध्य होण्यासाठी या कार्यालयाला आवश्यक अधिकार, अधिकारी-कर्मचारी तसेच प्रशासकीय सुविधा देणे आवश्यक असल्याचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत निवेदनावर अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याबाबत रिमार्क करून पत्र पुढे पाठविले. तसेच अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भातील समस्या लवकरच निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ चे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिले.
अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालय अधिक सक्षम झाल्यास अहेरीसह भामरागड, सिरोंचा, एटापल्ली व मूलचेरा या दुर्गम तालुक्यांतील नागरिकांना महसूल व इतर प्रशासकीय सेवा अधिक जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना त्यांच्या जवळच शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हे ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ मधील महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ चे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी सांगितले.














