✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे श्री गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच श्री गणेशाच्या आरतीने करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संतोष शिंदे, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे मनोहारी सादरीकरण केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली, तर पारंपरिक कोळीनृत्य, लावणी आणि देशभक्तीपर सामूहिक नृत्यांनी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. यासोबतच आरोग्य व सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या संक्षिप्त नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण व सेवेसोबतच महाराष्ट्राची समृद्ध लोककला, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत भावी परिचारिका म्हणून सेवाभावी वृत्ती, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा जोपासण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, सर्जनशिलतेचे कौतुक केले. अभ्यासासोबतच विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप महाप्रसाद व राष्ट्रगीताने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या छात्र प्रतिनिधींनी शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.

















