ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी समन्वयाने काम करावे
तहसीलदारांना दररोज आढावा घेण्याचे निर्देश
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतापर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ, गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करून त्याचा अहवाल दररोज सादर करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, या दृष्टीने शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पीकपेरा व प्रत्यक्ष नुकसान यांची खातरजमा करून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे शेतावर जाऊन पंचनामे करावेत..
पिकांचे नुकसान हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कळीचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने या कामाकडे संवेदनशीलतेने पाहावे. आपल्या परिसरात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत आणि प्रशासन आपल्या शेतापर्यंत पोहोचत आहे, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून पंचनाम्याच्या कामावर बारकाईने लक्ष द्यावे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांनी काम करावे. तहसीलदारांनी या कामाचा दररोज आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
💢पंचनाम्याच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांकडून काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तातडीने अहवाल सादर करावा. तहसीलदारांनीही अधूनमधून प्रत्यक्ष पंचनामा सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाची पडताळणी करावी.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध स्वरूपात दिसून येऊ शकते. त्यामुळे पंचनामे करताना संभाव्य नुकसानीचे सर्व पैलू विचारात घेणे आवश्यक आहे. केवळ पीक हिरवे दिसत आहे म्हणून त्याचे नुकसान झालेले नाही, असा निष्कर्ष काढू नये. प्रत्यक्ष उत्पादनावर होणारा परिणाम आणि पिकाची सद्यस्थिती यांचेही योग्य मूल्यमापन करावे.
ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी व महसूल यंत्रणेने सतर्क राहावे. तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा. कोणतेही गाव किंवा नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृशी अधिकारी गजानन पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. सोनोने यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra DGIPR Collector Chandrapur Revenue Department, Government of Maharashtra














