✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपणा:-कोरपणा येथून चोरीस गेलेल्या क्रेशर मशीनचा शोध घेण्यात कोरपणा पोलिसांना मोठे यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव गाठून जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉपमधून चोरीचे क्रेशर मशीन ताब्यात घेतले. याप्रकरणी एका संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी फिर्यादीने स्वतःच्या मालकीचे नादुरुस्त क्रेशर मशीन दुरुस्तीसाठी कोरपणा येथील राज वर्कशॉप येथे आणले होते. वर्कशॉप मालक राजस्थानला जात असल्याने मशीन पंधरा दिवसांनी दुरुस्तीसाठी आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे फिर्यादीने मशीन उड्डाणपुलाखालील जागेत ठेवले होते.
दरम्यान, २८ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी मशीन पाहण्यासाठी गेला असता तेथे मशीन आढळून आले नाही. आजूबाजूला शोध घेऊनही मशीन मिळून न आल्याने कोरपणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून गुन्हा क्रमांक ३१२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राकेश वाकुलकर (ब.नं. ९६९) यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे चोरीचे क्रेशर मशीन मारेगाव, जिल्हा यवतमाळ येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर २८ सप्टेंबर २०२६ रोजी पोहवा राकेश वाकुलकर आणि पोलीस शिपाई विशाल मोरे (ब.नं. १६५६) यांचे पथक मारेगाव येथे रवाना झाले. पोलिसांनी जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉप येथे शोध घेतला असता चोरीस गेलेले क्रेशर मशीन आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मशीन ताब्यात घेतले. या कारवाईचे ई-साक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आले. मशीन जप्त करून ते पोलीस ठाण्याच्या हेडमोहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत गुन्ह्यातील संशयित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे, पोलीस ठाणे कोरपणा यांच्या नेतृत्वात पोहवा राकेश वाकुलकर (ब.नं. ९६९) आणि पोलीस शिपाई विशाल मोरे (ब.नं. १६५६) यांनी केली.
कोरपणा पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पोलिसांनी सांगितले.













