✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, येथे मुलींचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘सखी सावित्री’ समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. किशोरवयीन मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, व्यक्तिमत्त्व विकास, स्वसंरक्षण, गुड टच-बॅड टच, सायबर सुरक्षितता तसेच कायदेविषयक बाबींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. सौ. सुप्रिया सावलिया यांनी महिला आरोग्य, स्वच्छता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. सौ. अलका दिलीप सदावर्ते यांनी व्यक्तिमत्त्व विकास व स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली. राजुरा पोलीस ठाण्याच्या PSI प्रवीणा पडोळे यांनी गुड टच-बॅड टच आणि सायबर सुरक्षिततेविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, तर ॲड. सौ. अंजली गुंडावार यांनी मुलींचे कायदेशीर हक्क व कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. तसेच समितीच्या सदस्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य, सुरक्षितता, स्वसंरक्षण आणि स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यासह आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, तसेच सखी सावित्री समितीच्या सदस्या डॉ. सौ. सुप्रिया सावलिया, अन्नु हरजीतसिंग संधू, सौ. सुवर्णा बोबडे, ॲड. मेघा धोटे, विद्या चौधरी, ॲड. सौ. अंजली गुंडावार, सौ. अलका दिलीप सदावर्ते, सौ. तेजस्विनी कावळे, सौ. राखी विजय उल्लीवर, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर, शिक्षिका सौ. ममता पुरटकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन विद्या चौधरी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.













