✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदूर:-गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरला ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ 2025-26 पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 2 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांत बोकारे,प्रमुख पाहुणे लक्ष्मीनारायण अभिमत विद्यापीठ नागपूर चे मा.कुलगुरु डॉ. अतुल वैद्य , प्र-कुलगुरू श्रीराम कवळे,गडचिरोली जिल्ह्य़ाचे जिल्हाध्यक्ष मा.श्रीअविष्यांत पंडा , कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण , लक्ष्मीनारायण अभिमत विद्यापीठ नागपूरचे कुलसचिव डॉ. नीरज खटी, विद्याशाखांचे सदस्य तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्मानिय सदस्य उपस्थित होते.
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे सचिव मा. श्री. धनंजयजी गोरे, उपाध्यक्ष श्री. विठ्ठलराव थिपे, सदस्य श्री. रामचंद्र सोनपितरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थिकेंद्रित उपक्रम, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रम, संशोधन, सामाजिक बांधिलकी तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूरच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा पुरस्कार महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे.














