स्थलातरीत करण्याची वंचितच्या नेत्या प्रज्ञा निमगडे यांची मागणी
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
आरमोरी:-आरमोरी येथील कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली THO (BPM) कार्यालयाची इमारत वर्षभरापासून धूळखात;
आरमोरी येथील तालुका आरोग्य अधिकारी (THO) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही या इमारतीचे लोकार्पण न झाल्याने ही सुसज्ज इमारत सध्या ‘धूळखात’ पडून आहे. दुसरीकडे, महत्त्वाचे असलेले हे कार्यालय मागील ६ वर्षांपासून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत दाटीवाटीने सुरू असल्याने कर्मचाऱ्यांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.⏩ प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल महिला जिल्हाध्यक्ष वंचितच्या प्रज्ञा निमगडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ही इमारत तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
वर्षभरापासून प्रतीक्षा: नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेली ही वास्तू केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत वापराविना पडून असल्याने शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या ६ वर्षांपासून THO कार्यालय एका उपकेंद्रात चालवले जात आहे. उपकेंद्र हे मुळात रुग्णांच्या सेवेसाठी असताना, तिथे कार्यालयीन कामकाज चालत असल्याने आरोग्य सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
वापराविना पडून असलेल्या नवीन इमारतीच्या परिसरात झुडपे वाढली असून, खिडक्या-दरवाजांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. योग्य देखभालीअभावी नवीन इमारतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
”शासकीय निधीतून उभारलेल्या वास्तूचा लाभ जनतेला आणि कर्मचाऱ्यांना वेळेत मिळणे आवश्यक आहे. एकीकडे उपकेंद्रात जागेअभावी कसरत करावी लागते आणि दुसरीकडे हक्काची इमारत असूनही तिथे जाता येत नाही, हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. येत्या काही दिवसांत जर हे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा वंचितच्या प्रज्ञा निमगडे यांनी दिला आहे.








