✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– शिक्षण विभागाच्या वतीने १८ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत सेंट क्लॅरेट इंग्लिश मीडियम स्कूल, चिमूर (जि. चंद्रपूर) येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये रामचंद्रराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय यश संपादन करीत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला आहे.
महाविद्यालयातील कुमारी कल्पिता के. गेडाम हिने डिजिटल वर्ल्ड ऑन क्लाउड (उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित) या अभिनव प्रकल्पाच्या सादरीकरणातून दिव्यांग श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या प्रकल्पाने तंत्रज्ञानाचा सामाजिक उपयोग, डिजिटल सक्षमीकरण आणि भविष्यातील संधी यांचे प्रभावी दर्शन घडवले. या उल्लेखनीय यशामुळे कुमारी कल्पिता हिची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी गीतांजली गेडाम मॅडम यांनी विद्यार्थिनीला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनामुळे आणि सततच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि कुटुंबीयांनी कुमारी कल्पिता के. गेडाम हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राज्यस्तरावरही ती अशीच उज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.








