भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घरगुती वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने गंभीर वळण घेतले असून मुलीसह आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दुहेरी हत्याकांड घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे (वय 30 वर्षे) असे असून आरोपी भाऊ सुरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरातील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संतापाच्या भरात आरोपीने बहिणीवर वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे (वय 55 वर्षे) यांनाही आरोपीने तलवारीने गंभीर जखमी केले होते. त्यांना तात्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते; मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सुरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केल्याची माहिती आहे.
संजीवनी या सुशिक्षित व कष्टाळू महिला म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते व विविध नोकरीसाठी प्रयत्न केले होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या ब्युटी पार्लरचे कामही करीत होत्या. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे तसेच आईच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा असून याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. भद्रावती पोलिसांनी आरोपी सुरज भोंडे व त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पुढील तपास सुरू आहे.








