✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्याचा मोठ्या थाटामाटात गवगवा करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश खणके यांनी केला आहे.
कोरपना तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रारंभी ६५ मिमी पावसाच्या निकषाचे कारण देत नुकसानभरपाईपासून तालुका वगळण्यात आला होता. त्यानंतर उद्धवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून नायब तहसीलदारांमार्फत आमदार राजुरा व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. या प्रयत्नांना यश येत अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली.
मात्र, निधी मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. मंजूर झालेला निधी नेमका गेला कुठे? असा सवाल उपस्थित करत हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी खणके यांनी केली आहे.
जर लवकरात लवकर अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.








