⏏️काल वरोरा-भद्रावती-पडोली येथे प्रभुला सेवा देण्यात आली. आता आश्रमाची गरज : रमेश हनुमंते
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : समाजाने विसरलेल्या निराधार, अनाथ, बेवारस, मानसिक दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींना माणुसकीची ऊब देण्याचे कार्य सर्वधर्म समभाव प्रभुसेवा संस्था, चंद्रपूर गेली दोन वर्षांपासून अविरतपणे करत आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्यासह 08 जुलै 2024 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने जात-धर्म-भेद न मानता शेकडो गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे.
रस्त्यावर भटकणाऱ्या, कुटुंब नसलेल्या, आजारी आणि अपंग व्यक्तींना संस्था शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन स्वच्छ अंघोळ, नवीन कपडे, पौष्टिक अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार दिले जातात. गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करून उपचारही केले जातात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुनर्वसनाचा प्रयत्न केला जातो.
काल दि. 27 जुलै रोज सोमवारला संस्थेच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी वरोरा, भद्रावती आणि पडोली येथे सेवा दिली. गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी ही सेवा नियमितपणे दिली जात आहे. अन्नदान, वस्त्रदानाबरोबरच आजारी व्यक्तींना उपचार आणि मानसिक आधार देणे हेही संस्थेचे महत्वाचे कार्य आहे.
संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वाढत असल्याने आता कायमस्वरूपी निवाऱ्याची म्हणजेच आश्रमाची गरज भासू लागली आहे. यासाठी समाजातील दानशूर, सेवाभावी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या सेवायज्ञात संस्थाअध्यक्ष रमेश हनुमंते, पदाधिकारी अरुण मांडवकर, सचिन नक्षिणे, प्रशांत वाटेकर, भाऊराव येसेकर,राजु बन्सोड, प्रेमलाल कडुकर, दीपक मांडवकर यांच्यासह सर्व सदस्य आणि महिला टीम सक्रिय आहे. समाजातील डॉक्टर, व्यापारी, पत्रकार आणि युवकांचे सहकार्यही संस्थेला लाभत आहे.
💢संस्थेचे म्हणणे आहे की, “भुकेल्याला अन्न, आजाऱ्याला उपचार आणि बेवारसाला सन्मान देणे हेच खरे पुण्यकर्म आहे. चला, आपण सर्व मिळून माणुसकीचा हा यज्ञ अधिक सक्षम करूया.”
दानासाठी संपर्क : सर्वधर्म समभाव प्रभुसेवा संस्था, चंद्रपूर















