भद्रावती पोलिसांची धाड, 3460 रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा सुमठाणा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध कोंबड बाजारावर भद्रावती पोलिसांनी रविवारी धाड टाकली. कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावणाऱ्या 4 जणांना अटक करून एकूण 3 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार आणि त्यांचे सहकारी रविवार दिनांक 26 जुलै रोजी टाऊन बीट परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी सुमठाणा येथील शेतात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळी अचानक छापा टाकला.
पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पाठलाग करून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले.
यात आरोपी गणेश मनोहर फटाले (36), रा. श्रीनगर, विजासन रोड, भद्रावती, राजा मोठी शेट्टी (39), रा. मोहबाळा, ता. भद्रावती, अतुल ज्ञानेश्वर पिंपळकर (31), रा. मासळ, ता. भद्रावती, अशोक शंकर कावळे (65), रा. दाताळा, जि. चंद्रपूर यांना अटक केले़.
👉आरोपींकडून 1 हजार 960 रुपये रोख जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून 5 कोंबडे – 2 जखमी आणि 3 जिवंत – ताब्यात घेण्यात आले. हे कोंबडे पोलीस ठाण्यात लिलाव करून 1 हजार 500 रुपये प्राप्त झाले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
🚨ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष केदार , सपोनि मिश्रा, पोलीस अंमलदार खुशाल, जितेंद्र फराते, प्रेम बावनकर व योगेश घुगे यांच्या पथकाने केली.















