प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन १४ मार्च रोजी करण्यात आले. या शिबिराला परिसरातील सुमारे २० गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरात शासनामार्फत दिले जाणारे विविध दाखले व प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. तसेच नागरिकांच्या शासकीय कामांची सोय एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने विविध विभागांनी माहिती व सेवा देण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारले होते.
या शिबिरात रजिस्टर कार्यालय, महसूल विभाग, महावितरण, पशुवैद्यकीय विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, वन विभाग, आधार केंद्र, अंगणवाडी तसेच इतर शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांना योजनांची माहिती देत त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड होते. यावेळी सरपंच अनिल आलम, उपसरपंच प्रतिताई पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव पाला, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सरिता रेड्डी, पशुवैद्यकीय अधिकारी भाग्यश्री बेलसरे, तसेच परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याशिवाय विरुर विभागाचे मंडळ अधिकारी सुभाष साळवे, तलाठी शिल्पा बल्लेवार तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा शिबिरांचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. तर तेलगू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या शिबिरामुळे विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.








