✍️ प्रा. मुनिश्वर बोरकर RPI
गडचिरोली:-प्रसिद्ध द्विभाषिक कवी,गझलकार व आरमोरी येथील महात्मा गांधी कला ,विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.नोमेश नारायण मेश्राम यांच्या मागील वर्षी प्रकाशित ‘अ वून्डेड स्काय ’ या इंग्रजी कवितासंग्रहाला लुमिनरी लिटररी सोसायटीच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘ बेस्ट सोसायटल कॅटेगरी पोएट्री अवॉर्ड’ जाहीर झाला आहे.या कवितासंग्रहाचे वर्ल्ड बुक फेअर दिल्ली येथे लोकार्पण करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रणी आणि अत्यंत प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक संपादन केलेल्या ब्लूरोज पब्लिशिंग हाऊस लंडनने हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून या कवितासंग्रहात त्यांच्या शंभर इंग्रजी कवितांचा समावेश आहे.‘अ वून्डेड स्काय ’ या कवितासंग्रहात भारतातील सर्वहारा समाजातील लोकांची दैन्यावस्था,स्वातंत्र्य, समता,न्यायाची होत असलेली गळचेपी,शोषण, जागतिकीकरणात विविध ज्वलंत प्रश्नांनी विद्रुप झालेल्या भारताचे वास्तववादी चित्र त्यांनीं रेखाटले आहे.त्यांचे ‘वादळांच्या कविता’, ‘वेदना आभाळ झाली’, ‘रक्तफुलांचे ताटवे’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या कवितासंग्रहाना ३५ पेक्षा अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या कवितांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.त्यांचा हा पहिलाच इंग्रजी कवितासंग्रह असून त्याला बंगलोर येथील एस. एफ.फाऊंडेशनतर्फे ‘ बेस्ट रिफ्लेक्टिव पोएट्री अवॉर्ड’ ने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. अभिनव शैली,विषयवैविध्य, अभिव्यक्तीतील नवता, पराकोटीची संवेदनशीलता व व्यापक जीवनदृष्टीने हा कवितासंग्रह वर्तमान भारतीय इंग्रजी कवितेत ठळकपणे उठून दिसणारा आहे असे भाष्य लुमिनरी लिटररी सोसायटीने ‘बेस्ट सोसायटल पोएट्री अवॉर्ड ’ जाहीर करताना केले आहे.येत्या २४ ऑक्टोबरला कोची, केरळ येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.














