आमदार देवराव भोंगळे यांचा विकासाचा झंझावात; विविध लोकावश्यक व रखडलेल्या कामांना मिळणार गती.
राजुरा:-दि. ०६
दिवाळीच्या आनंदमयी शुभपर्वावर राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत आनंदाची आणि सुवर्णोपहार देणारी बातमी समोर आली आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि विशेष प्रयत्नांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत गोंडपिपरी, जिवती आणि कोरपना या तीनही नगरपंचायतींच्या हद्दीतील विविध विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
या निधीमुळे गोंडपिपरी, जिवती व कोरपना या तिन्ही नगरपंचायतींच्या क्षेत्रात विविध लोकावश्यक कामे होणार असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या विकासाच्या झंझावतामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे स्वागत होत आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या कालावधीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विशेष निधीमध्ये गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी २ कोटी रुपये, जिवती नगरपंचायतीसाठी २ कोटी तर कोरपना नगरपंचायतीसाठी १ कोटी रुपयांचा समावेश असून, एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवाळीच्या शुभपर्वावर शासनाकडून मिळालेल्या या भरगोस निधीमुळे नगरपंचायतींच्या क्षेत्रातील रखडलेल्या व महत्त्वपूर्ण विकासकामांना आता गती मिळणार आहे.

या निधीतून तिन्ही नगरपंचायतींच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये गोंडपिपरी नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र. ७ मध्ये आधुनिक मच्छी व मटन मार्केटचा विकास, सर्वधर्मीय स्मशानभूमीचा विकास, बौद्ध विहारासमोर शेडचे बांधकाम, जि.प. कन्या व मुलांच्या शाळेतील खेळाचे मैदान व बगीचाचा विकास, नगरपंचायत वाचनालयाचे नूतनीकरण व फर्निचरची कामे, तसेच विविध वार्डांमधील धार्मिक ठिकाणी सामाजिक सभागृहांचे बांधकाम यांसारख्या अनेक लोकोपयोगी कामांचा समावेश आहे.
तसेच जिवती नगरपंचायत अंतर्गत संत सेवालाल महाराज समाज मंदिर, जगदंबा देवी समाज मंदिर, शांतीनगर व इतर भागांत एचडीपीई पाईपलाईनद्वारे सुरळीत पाणी वितरण व्यवस्था, विविध प्रभागांमध्ये सामाजिक सभागृहे, बसस्थानक जवळ लोकसेवा केंद्राचे शेड आणि किचन शेडचे बांधकाम केले जाणार आहे. यासोबतच कोरपना नगरपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्र. १३ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभामंडप बांधकाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समाज भवन, बुरुड समाज भवन येथे शौचालय, सामाजिक सभागृह तसेच मुस्लीम कब्रस्थान येथे संरक्षण भिंत व शेडचे बांधकाम यांसारख्या लोकावश्यक कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मिळाला आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी स्वतः या विकासनिधीसाठी पाठपुरावा करून हा निधी खेचून आणल्यामुळे नागरिकांच्या मूलभूत आणि सामाजिक सोयी-सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. याआधी नगरपरिषद राजुरा व गडचांदूरसाठी देखील त्यांनी प्रत्येकी ५ कोटींचा विकासनिधी मंजूर करून आणला आहे. त्यातून राजुरा व गडचांदूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
दिवाळीच्या या मंगलपर्वावर मिळालेल्या या भरघोस विकास निधीमुळे गोंडपिपरी, जिवती आणि कोरपनावासीयांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि प्रकाशमय ठरली असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या धडाकेबाज व विकासवादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.













